Aug 16, 2012

नासाची "मंगळ" वारी ....



नासाची "मंगळ" वारी ....

मंगळाच्या पृष्ठभागावर उतरल्यानंतर काही वेळातच "क्‍युरिऑसिटी'ने पृष्ठभागाची तीन छायाचित्रे पृथ्वीवर पाठविल्याने शास्त्रज्ञांचा उत्साह दुणावला. गेल्या वर्षी 26 नोव्हेंबर रोजी हे यान अंतराळात सोडण्यात आले होते. एखाद्या
छोट्या मोटारीच्या आकाराएवढ्या या उपग्रहासाठी 2.5 अब्ज अमेरिकी डॉलर खर्च आला आहे. आतापर्यंतचे हे अत्याधुनिक यान आहे. सुमारे 56 कोटी किलोमीटरचे अंतर पार करून यान आज सकाळी मंगळाच्या वातावरणात पोचले तेव्हा सर्व शास्त्रज्ञांच्या नजरा त्याच्याकडेच लागल्या होत्या. मंगळाच्या वातावरणात प्रवेश केल्यानंतरची सुमारे सात मिनिटे सर्वांत महत्त्वाची होती. कारण, सर्वाधिक घर्षणाचा सामना त्याच वेळी करावा लागणार होता. परंतु, "क्‍युरिऑसिटी'ने सकाळी 11 वाजता मंगळावर पाऊल ठेवले आणि सर्व शास्त्रज्ञांनी एकच जल्लोष केला. मंगळावर 2030पर्यंत मानव पाठविण्याचे उद्दिष्ट "नासा'ने ठरविले आहे, त्याची तयारी म्हणून या मोहिमेचे विशेष महत्त्व आहे. यानात विविध उपकरणांबरोबर पृथ्वीची माहिती असणारी "चिप'ही पाठविण्यात आली आहे. त्यात 59,041 भारतीय नावेही समाविष्ट आहेत.

सात मिनिटांचा थरार
- दहा मिनिटे अगोदर क्‍युरिऑसिटी रोव्हर संरक्षक कॅप्सूलपासून वेगळा.
- पृष्ठभागावर उतरण्यास सात मिनिटे शिल्लक असताना मंगळाच्या वातावरणात प्रवेश. पृष्ठभागापासून 125 किलोमीटर अंतर. वेग 5,900 मीटर प्रतिसेकंद.
- जमिनीपासून 11 किलोमीटर अंतरावर वेग कमी करणारे खास पॅराशूट उघडले.
- याच वेळी स्वयंचलित कॅमेरा कार्यान्वित.
- लॅंडिंगच्या 12 सेकंद आधी रॉकेट पॉवर्ड बॅकअप कवचातून नायलॉन दोऱ्या उघडल्या.
- एखाद्या छोट्या मोटारी एवढ्या आकाराच्या रोव्हरची चाके जमिनीला टेकताच दोऱ्या आपोआप तुटल्या.
- मंगळाच्या दक्षिण गोलार्धातील गेल सरोवराच्या भागात लॅंडिंग.
- काही क्षणांत पृष्ठभागाची पहिली तीन छायाचित्रे पृथ्वीकडे रवाना.

"क्‍युरिऑसिटी'ची वैशिष्ट्ये
- हा रोव्हर 686 दिवस तेथील पृष्ठभागावर फिरत राहणार आहे.
- त्याचा तेथील फिरण्याचा वेग हा 90 मीटर प्रतितास असेल.
- संपूर्ण कालावधीत हा रोव्हर 19 किलोमीटर फिरण्याची शक्‍यता.
- हा रोव्हर आतापर्यंत पाठविल्या गेलेल्या दोन रोव्हर (स्पिरिट आणि अपॉर्च्युनिटी) यांच्यापेक्षा दुप्पट आकाराचा आहे.
- रोव्हरची सर्व सहा चाके उंच असल्यामुळे 75 सेंटिमीटरपर्यंतच्या उंचीचे अडथळे तो सहज पार करू शकतो.
- रेडिओ ध्वनिलहरी पृथ्वीवर पोचण्यास लागणारा कालावधी (कम्युनिकेशन लॅग) 13.8 मिनिटे.