Aug 5, 2012

तवा पुलाव


 तवा पुलाव  

साहित्य :
भातासाठी
१) एक टीस्पून बटर
२) पाऊण कप बासमती तांदूळ
३) दीड ते पावणेदोन कप पाणी
४) मीठ

मसाला
१) गाजर पाव कप पातळ चिरलेले (१ इंचाचे तुकडे)
२) भोपळी मिरची पाव कप पातळ उभी चिरलेली (१ इंच तुकडे)
३) फ्लॉवरचे तुरे अर्धे शिजवलेले पाव कप
४) कांदा पाव कप बारीक चिरून, १/८ कप उभा चिरून
५) टॉमेटो अर्धा कप बारीक चिरून
६) शिजवलेला बटाटा १/८ कप बारीक फोडी
७) वाफवलेले मटार १/४ कप
८) दीड टीस्पून लसूण पेस्ट
९) अर्धा टीस्पून जिरे
१०) दीड टीस्पून लाल तिखट
११) दोन टीस्पून बटर
१२) एक टीस्पून पावभाजी मसाला

खडा मसाला
१) एक लहान तुकडा दालचिनी
२) दोन लवंगा
३) एक तमाल पत्र
४) एक वेलची
५) सजावटीसाठी चिरलेली कोथिंबीर

कृती :
बासमती तांदूळ धुवून १० मिनिटे निथळत ठेवावा. नंतर १ टीस्पून बटर नॉनस्टिक भांड्यात गरम करावे. त्यावर बासमती तांदूळ २ ते ३ मिनिटे परतावा. नंतर दीड ते पावणेदोन कप पाणी घालावे. थोडे मीठ घालावे. मिडीयम लो फ्लेमवर झाकण न ठेवता भात शिजवावा. मधूनमधून ढवळावा. भात शिजला की, एका ताटात किंवा परातीत तो मोकळा करावा. थोडे बटर शिजलेल्या भाताला लावून घ्यावे. वरून बटर घातल्याने भाताला छान तकाकी येते. हे करताना भाताची शिते मोडणार नाहीत, याची काळजी घ्यावी.

नंतर नॉनस्टिक तवा मध्यम आचेवर गरम करावा. त्यात २ टीस्पून बटर घालावे. लगेच जिरे घालावेत. जिरे तडतडले की, लसूण पेस्ट आणि लाल तिखट घालावे. ३० सेकंद परतावे.

कांदा घालून थोडे परतावे. कांदा थोडा शिजला की, भोपळी मिरची आणि गाजर घालावे. साधारण २ ते ३ मिनिटे परतावे. भाज्या अगदी पूर्ण शिजवू नयेत.

नंतर फ्लॉवरचे तुरे, टॉमेटो घालून १-२ मिनिटे परतावे. त्यानंतर मटार, बटाटा आणि पावभाजी मसाला घालावा. चवीनुसार मीठ घालावे. पावभाजीला करतो तशा या भाज्या मॅश करू नयेत. कारण पुलावात भाज्या दिसल्या पाहिजेत.

ही भाजी तयार झाली की ती तव्याच्या एका कडेला करून घ्यावी. तव्याच्या रिकाम्या भागात अर्धा टीस्पून बटर घालावे. त्यात खडामसाला घालावा. १० - १५ सेकंद परतून भाजी त्यात मिक्स करावी. जर आपण खडा मसाला आधीच फोडणीत घातला असता तर त्याचा स्वाद गरजेपेक्षा जास्त उतरला असता. म्हणून भाजी झाल्यावर शेवटी खडा मसाल्याची फोडणी करून भाजीत मिक्स करावी.

भाजी झाली की गॅस मिडीयम हायवर ठेवावा. या भाजीत तयार भात घालावा. भाताचे ४ भाग करून एकेक भाग भाजीत घालावा म्हणजे सर्व भाताला भाजी लागेल आणि नीट मिक्स होईल. तव्यावर हा भात छान परतून रायत्याबरोबर गरम गरम सर्व्ह करावा.