Feb 9, 2013

Marathi Kavita मराठी कविता


मेघमल्हाराची सुरू झाली तयारी।
नभी सजली आज एक सभा भारी।

छेडण्या गगनी जलस्वरांची तार।
एक एक ढग आज आतुर फ़ार॥

आणि मग सुरु जाहला तो सोहळा अनुपम।
असंख्य जलथेंबांचे घुंगरू निनादती छमछम॥

नभोमंडपी वीज नर्तकी करी थय थय थैमान।
ढगही धरती एक सुंदर तान,वाऱ्याची बासरी बेभान॥

प्रेक्षक वृक्ष या तालावर डोलती।
या सोहळ्याचे सुंदर गाणे तेही मनात बोलती॥

मग धावुनी आला तो मयुर नर्तक।
वनी ताल धरी, करी सुंदर कथ्थक॥

वसुंधराही या धारानी जाहली आज तृप्त।
प्रत्येकाच्याच मनाची पूर्ण झाली अभिलाषा एक सुप्त॥

शेवटी इंद्रधनुने होई सोहळ्याची सांगता।
काय सांगु ते दृश्य मज न ये वानता॥

ज्याने पाहिला हा सोहळा देखणा।
त्यासी वाटला स्वर्ग ही पुरता उणा॥