परदेशी उडणाऱ्या पाखरांची कळवळती स्वरे
फसवुनी गेले फिरंगी स्वप्नं यशाचे नवे ,
पांपण्यांतून आसवांच्या सवे
आठवांचे धावुनी आले थवे ....
सख्या सोबतींत हरवले ते बालपण
दूर जाण्यात सख्या नव्हते रे काही शहाणपण ,
कठीण प्रसंगी मित्रत्वाची साद घातली जेव्हा ....
पांपण्यांतून आसवांच्या सवे
आठवांचे धावुनी आले थवे ....
बाबांचा धाक , आईचा तो मायेचा हात
त्यासम सुख दुसरे नाही या जगतात ,
दाटुनी आल्या मायेच्या भावना जेव्हा ...
पांपण्यांतून आसवांच्या सवे
आठवांचे धावुनी आले थवे ....
दुरावले प्रेमाचे नाते ,
तुटले सात जन्माचे वचन
सुटले पवित्र मनाचे ते रेशमी बंधन ,
व्याकुळले मन त्या एका स्पर्शास जेव्हा ...
पांपण्यांतून आसवांच्या सवे
आठवांचे धावुनी आले थवे ....
टाळली आजवर सारी बोलावणी
ऐकू ना आली मजला आर्जवे केविलवाणी ,
आखरीस उमगले व्यर्थ सारे यश
कवडीमोल ठरली सारी नाणी ,
मायदेशी परतीची वाट दिसली तेव्हा ...
पांपण्यांतून आसवांच्या सवे
आठवांचे धावुनी आले थवे ....
