Jul 1, 2012

"शेतकरी मुलगा हवा"

 
महाराष्ट्रातील कोणतेही वृत्तपत्र, साप्ताहिक, मासिक किंवा पाक्षिक घ्या- त्यामध्ये... "वधू-वर पाहिजे' अशा जाहिराती असणारच. त्यांतील सगळ्या जाहिराती धुंडाळल्या, तर त्यांत "शेतकरी मुलगा हवा,' अशी अपेक्षा असणारी एकही जाहिरात सापडणार नाही. डॉक्‍टर, इंजिनिअर, प्राध्यापक, शिक्षक या "कॅटेगरी'चा निर्देशांक उसळता आहे. शिवाय सरकारी, सहकारी किंवा खासगी नोकरदारांनाही प्राधान्य. यात अगदी मुलगा बिजवर असला तरी चालतो; परंतु तो शेतकरी मात्र नको, अशी स्थिती !
शेती हवी, शेतकरी नको
कौटुंबिक स्थिती चांगली आहे. कारखान्याला शंभर टन ऊस जातो. एखादी मोटारसायकल आहे. गावात राहायला चांगले घर आहे, या सगळ्या जमेच्या बाजू असल्या, तरी नुसती शेती करणाऱ्या तरुणांना लग्न करताना नाकी नऊ येतात. "स्थळ म्हणून चांगले आहे हो; पण नवरा नुसतीच शेती करतो, हे पोरीला पसंत नाही,' असे सांगत स्थळांकडून नकार येतात.
हे असे का होते, याचा शोध घेतल्यास काही महत्त्वाची कारणे समोर येतात. त्यातील सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे, शेतकरी कुटुंबातील नव्या पिढीची श्रमांशी, कष्टांशी तुटलेली नाळ. त्याला "काळ्या आई'ची सेवा करणे हा कमीपणा वाटू लागला आहे. मातीत आणि शेणात हात घालायची त्याला लाज वाटू लागली आहे. खरेतर श्रमांचेच अवमूल्यन झाले आहे. एक काळ असा होता, की "उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी,' असे म्हटले जात असे आणि तशी वस्तुस्थितीही होती; पण भौतिक सुखाच्या मागे लागलेल्या आणि कमी कष्टांत जास्तीत जास्त सुखांची स्वप्ने पाहणाऱ्या प्रवृत्तींना कष्ट देणारी शेती कनिष्ठ वाटू लागली आहे. नोकरीसारखी परावलंबी भाकरी गोड वाटू लागली आहे; यातूनच आजच्या मुलींचा कल "शेतकरी नवरा नको', असा झाला आहे. आपल्या मुलीला शेतीची कष्टप्रद कामे करायला लागू नयेत, मोठ्या शहरात बंगला असलेला, चांगल्या वस्तीत फ्लॅट असलेला सूट-बूट घालणारा मुलगाच तिला सुख देईल, या कल्पनेने पछाडलेले आई-वडील आपल्या मुलीसाठी शेतकरी मुलगा नकोच, अशी धारणा पक्की करून बसले आहेत. त्यातही पुन्हा एक गंमत आहे ती म्हणजे, मुलाची श्रीमंती किती, याचे मूल्यमापन करताना "आपली मुलगी गरीब घरात दिली,' असे होऊ नये, म्हणून त्यांना शेती असलेला मुलगा हवा आहे; मात्र तो स्वतः शेतकरी नको! नुसती नोकरी असली आणि शेती नसली, तरी लग्न ठरताना अडचणी येतात. "नोकरी गेल्यावर त्याने काय भीक मागून पोट भरायचे का?' अशी टोकाची विचारणा केली जाते. त्यामुळे नोकरी हवी, ती दरमहा हाती येणारा पैसा देण्यासाठी. शेती हवी ती इभ्रत वाढविण्यासाठी. फक्त नवऱ्याने त्या शेतीत जाऊन काम मात्र करू नये, ती त्याच्या नुसती नावावर असावी, असा विचित्र आग्रह मोठ्या प्रमाणावर धरला जाऊ लागला आहे.