गुरुपौर्णिमा...खरं तर गुरू- शिष्य परंपरेविषयी कृतज्ञताव्यक्त करणारा हा दिवस. गुरू- शिष्य म्हटलं, की आपल्या सर्वांना आठवते ती एकलव्य आणि द्रोणाचार्य यांची कथा. धर्नुविद्येत पारंगत असलेल्या एकलव्यने द्रोणाचार्यांना गुरुच्या स्थानी ठेवून त्यांच्या चरणी आंगठा कापून ठेवला. त्या एवलव्यविषयी आजही आपल्या समाजात आदर आहे. पूर्वी गुरुगृही राहून त्यांची सेवा करून विद्या ग्रहण करण्याची प्रथा होती. कलेची (नृत्य, संगीत, नाट्य) परंपरा ही आजही मौखिक असल्याने केवळ याच क्षेत्रात गुरु-शिष्य परंपरा शिल्लक आहे. अन्यथा, गुरु- शिष्य परंपरेचं नातं बदलत चाललं आहे. त्यामुळे आता शिक्षकालाच गुरुच्या ठिकाणी ठेवून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. 'तारें जमीन पर' या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता आमीर खानने शिक्षक- विद्यार्थी या नात्याचा आणखी एक पैलू समाजासमोर ठेवला. अशा गुरू- शिष्य नात्याविषयीच्या अनेकआठवणी प्रत्येकाच्या मनात रुंजी घालत असतात. आपणही आपल्या मनात एखाद्या शिक्षकाच्या आठवणींचा ठेवा जपलेला असतो. शालेय जीवनांत आपला आदर्श, हिरो तेच असतात.
