Aug 11, 2012

नागपंचमी


श्रावण महिन्यात शुक्ल पंचमीला येणारा हा सण निसर्गातील प्राण्यांविषयी लोकांना जाणीव करून देणारा आहे. शेतीची नांगरण करण्याचा काळ, आणि त्यामुळे वारुळ-नाग असा त्याचा विचार करून नागांचे रक्षण करण्याचा संदेश देणारा हा सण आहे. कापणे, तळणे, भाजणे, नांगरणे अशी कामे करू नयेत अशी एक प्रथा त्याला जोडली आहे. वारुळांची पूजा व नागांची पूजा करून त्यांना दूध आणि लाह्यांचा नैवेद्य दाखवला जातो. मुली, स्त्रिया झाडाला झोका बांधून खेळतात; झिम्मा, फुगडी यांसारखे पारंपरिक खेळही खेळतात. महाराष्ट्रात नागपंचमीला असंख्य तरुण पतंग उडविण्याचाही आनंद लुटतात. पतंग उडवण्याच्या माध्यमातून पुरुष या सणाला जोडले गेले आहेत. सृष्टी हिरवीगार होऊन वातावरण आनंदाचे झालेले असते त्याच वेळी म्हणजे श्रावणात असे बरेच सण-दिवस साजरे केले जातात. हा श्रावणाच्या सुरुवातीला येणारा सण आहे. वारुळापर्यंत जाणे हे आनंदाचे व्हावे, एकत्र येण्याची मजा सगळ्यांना घेता यावी म्हणून फेर धरणे, गाणी म्हणणे, फुगड्या, झिम्मा, झोका असे खेळ खेळणे या गोष्टी नागपंचमीला जोडल्या गेल्या असाव्यात.

सांगली जिल्ह्यात बत्तीसशिराळा नावाच्या गावात अनेक गारुडी नाग पकडून आणतात. नागांनी फणा काढणे, पुंगीने मोहून जाणे असे खेळ दाखवले जातात. ही प्रथा गेली कित्येक वर्षे सुरू आहे.

नाग व इतर अनेक जंगली प्राणी माणसाने भीतीपोटी मारणे फार पूर्वीपासून सुरूच आहे. हे प्राणी निसर्गाचा समतोल टिकवतात, त्यांचे एक विशेष असे काम निसर्गत: सुरू असते. म्हणून त्यांचा नाश होऊ नये आणि विज्ञाना-आधारे अशा प्राण्यांच्या विषयी योग्य माहिती लोकांना कळावी यासाठी चळवळी सुरू आहेत. नागाला मारणार नाही अशा निश्र्चयानेच नागांची चांगली पूजा होईल असा पर्यावरणवादी विचार या उत्सवाबाबत करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते करतात. शेतीचा नाश करणार्‍या उंदरांचा नाश करण्याचे नागांचे काम सुरू राहणे आवश्यक आहेच. नागाची कात औषधी असते, सुंदर असते, काही सापांचे विष अत्यंत उपयोगी आणि मौल्यवान असते. म्हणूनच साप-नागांची हत्या होऊ नये असा प्रयत्न विज्ञानवादी, पर्यावरण रक्षणासाठी प्रशिक्षित असलेले लोक अलीकडे करत आहेत. या प्रयत्नांमुळे या सणाकडे पर्यावरणीय दृष्टीने पाहण्याचा कल सतत वाढतो आहे.