श्रावणातील ही पौर्णिमा ही समुद्रकिनार्यालगतच्या लोकांना, मासेमारी करून पोट भरणार्या कोळी बांधवांना मोठी आनंदाची असते. या सुमाराला खवळलेला समुद्र शांत होतो, पावसाचा जोर ओसरतो आणि होड्या पुन्हा समुद्रावर मासेमारीसाठी घेऊन जाण्याची सुरुवात केली जाते. समुद्राची पूजा करून, नारळ अर्पण करून, समुद्राला शांत होण्याची, वादळापासून संरक्षण करण्याची प्रार्थना केली जाते. नारळाच्या औषधी गुणांची, या बहूपयोगी कल्पवृक्षाची, समुद्रकिनारी वाढणार्या झाडाची या निमित्ताने आठवण केली जाते. नारळाचे गोड पदार्थ करून हा सण साजरा करतात. भारताला सुमारे १५१७ कि.मी. लांबीचा व महाराष्ट्राला सुमारे ७२० कि. मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. सागरी व्यापार आणि समुद्रावर होणारी मासेमारी यामुळे त्याचे महत्त्व अधिक आहे. त्यामुळे निसर्गातील या रूपाची, मिळालेल्या देणगीची सर्व जण या निमित्ताने आठवण ठेवतात.
