भारतात व महाराष्ट्रातही या सणाचे फार मोठे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व आहे. दिवे लावून हा सण साजरा करतात. दु:ख, वेदना, यातना यांचा अंधार दूर करून आनंद, समाधानाचा प्रकाश घेऊन येणारा सण म्हणजे दीपावली. या सुमाराला शेतीतून धान्य आलेले असते. पाऊस संपून हवा थंड होऊ लागलेली असते, दिवस लहान आणि रात्र मोठी असाही बदल जाणवू लागलेला असतो. धनधान्याने संपन्न झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी एक निमित्त मिळते. वसुबारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज असे दिवाळीचे दिवस असतात. मन प्रसन्न करणारी थंडी, या आल्हाददायक वातावरणात पहाटे अभ्यंगस्नानाचा अनुभव घेणे, सुवासिक तेल, सुगंधी उटणे यांचा वापर, मंदिरात जाऊन देवाचे दर्शन, फराळाच्या पदार्थांचा आस्वाद घेणे आणि मित्र-आप्तेष्ट - नातेवाईक यांच्या भेटीचा आनंद लुटणे, फटाके उडवणे - अशा सर्व गोष्टींचा मनसोक्त अनुभव म्हणजे दिवाळी!
