व्यासपौर्णिमा - गुरुपौर्णिमा
आषाढ शुद्ध पौर्णिमेला म्हणजे या तिथीला आपण गुरुपौर्णिमा म्हणून गौरवितो. अनेक विद्यालयांतून, महाविद्यालयांतून श्रद्धाशील विद्यार्थी आपापल्या गुरुजनांसमोर या दिवशी विनम्र भावनेने नतमस्तक होतात. वेगवेगळ्या पंथोपपंथांतून ईश्वरभक्तीकडे जाण्याचे मार्ग शोधणारे मुमुक्षू-पारमार्थिक या दिवशी आपल्या गुरुंचे भक्तिभावाने पूजन करतात. ज्यांना या ना त्या कारणांमुळे गुरुंचे समक्ष दर्शन वा सहवास घडू शकत नाही ते त्यांच्या प्रतिमेची पूजा करतात. सन 2011 मध्ये गुरू पौर्णिमा दिनांक 15 जुलै रोजी आहे.
आजकाल गुरुपूजनाचे कार्यक्रम खूप होत असले तरी सगळेच गुरू इतपत श्रेष्ठ दर्जाचे असतीलच असे म्हणता येत नाही. पण गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपापल्या गुरूला त्या उच्चतम गुरू-शिष्य परंपरेतील एक दुवा मानून त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन त्यांचे आशीर्वाद घेणे हा आपल्या संपन्न सांस्कृतिक परंपरेचा एक महत्त्वाचा तसेच अभिमानाचा भाग आहे.
स्कंद पुराणात गुरूचे महात्म्य दिलेले आहे, ते खालीलप्रमाणे -
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु
गुरुर्देवो महेश्वरः
गुरु साक्षात् परब्रह्म
तस्मैश्री गुरुवे नमः
गुरू ब्रह्म, विष्णु आणि शिव आहे. साक्षात परब्रह्म
असलेल्या गुरूला माझा नमस्कार असो.
कलाक्षेत्रातसुद्धा या दिवसाला आगळेवेगळे महत्त्व आहे. संगीत क्षेत्रामध्ये ज्या गुरुकडून विद्या घेतली त्यांची काही सेवा किंवा घेतलेल्या विद्येबद्दलची कृतज्ञता श्रद्धापूर्वक या दिवशी व्यक्त केली जाते. ज्यांना या दिवशी अशा प्रकारे भक्तिभाव व्यक्त करणे शक्य होत नाही ते यानंतरच्या सोयीच्या दिवशी गुरुवंदनाचा कार्यक्रम करतात. गुरू आणि शिष्य हे एक अद्भुत नाते आहे. गुरू म्हणजे शिकविणारा नव्हे. ज्याला आपल्या शिष्याबद्दल ममत्व वाटते, आपल्यापाशी असलेली ज्ञानसमृद्धी शिष्यापर्यंत पोहोचवावी अशी ज्याला तळमळ असते, 'शिष्याद् इच्छेत् पराजयम्' या वचनाप्रमाणे शिष्याने आपल्याही पुढे जावे अशी इच्छा जो मनोमन बाळगतो, तो खरा गुरू.
गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. याबद्दलची माहिती अशी की व्यास हे सर्व गुरूंचे गुरू. परमगुरूंचे परमगुरू. व्यासांनी आपल्याला म्हणजे आपल्या भारतवर्षाला, आपल्या भारतीय संस्कृतीला खूप काही दिले आहे. त्यांनी वेदांचे विभाजन करून त्यांची नीट मांडणी केली हे तर खरेच. ब्रह्मसूत्रांच्या रूपाने त्यांनी अध्यात्मविचारांचा एक उत्तुंग हिमालय आपल्यासमोर उभा केला. महाभारतासारखा प्रचंड ग्रंथ त्यांनी लिहिला. महाभारतातील व्यक्तिरेखा आपण आपल्या नेहमीच्या जीवनातही इतक्या सहजपणे शोधू पाहतो की, कर्णासारखा उदार, कृष्णासारखा धोरणी, शकुनीमामासारखा कपटी, धर्मासारखा सत्शील, भीमासारखा बलवान, भीष्मासारखा प्रतिज्ञाबद्ध असे कितीतरी मानवी मनाचे आणि वर्तणुकीचे नमुने आपण महाभारतावरून नेहमीच्या बोलण्या-चालण्यातही उचलत असतो. कौरव-पांडवांच्या युद्धाचा संदर्भ वारंवार दिला जातो. बळाने वा संख्येने कमी असूनही जर सत्य आणि न्याय आपल्या बाजूला असेल तर शेवटी आपलीच सरशी होणार, हा विश्वास महाभारताच्या आधाराने बळकट होऊ शकतो. बर्यावाईट वागण्याचे नमुने, विविध व्यक्तिरेखा महाभारतातून आपल्याला सतत भेटत राहतात. महाभारताचे हे भारतीयत्व आसेतुहिमाचल सर्वत्र आढळते.
भगवान श्रीकृष्णाच्या अद्भूत लीलांचे आणि त्याच्या पराक्रमाचे वर्णन करतांना व्यासांनी मानवी भावभावनांची कितीतरी मनोहारी चित्रणे श्रीमद्भागवतात दाखविली आहेत. व्यासांनी महाभारतानंतर भागवत लिहिले, पुराणे लिहिली. नीतिशास्त्राचे केवळ नियम सांगण्याऐवजी त्यांनी या बर्यावाईट शुभाशुभ भावभावनांचे मधुर नर्तन आणि रौद्रभीषण तांडव विविध पौराणिक कथांतून आणि ऐतिहासिक घटनांतून आपल्यासमोर मूर्तिमंत उभे केले. नव्या पिढीने जुन्या पिढीपेक्षा अधिक उन्नत व्हावे, आयुष्याच्या वाटचालीत त्यांना महत्त्वाचे खाचखळगे आणि चढउतार विनासायास जाणून घेता यावेत आणि तेही मनोरंजक कथेच्या माध्यमातून समजावेत, हा कोणत्याही काळच्या शिक्षणशास्त्राला, कोणत्याही ठिकाणच्या गुरू-शिष्य परंपरेला आदरणीय वाटावा, असा थोर कित्ता व्यासांनी आपणासमोर ठेवला.
गुरू हा नेहमीच भगव्या किंवा शुभ्र वस्त्रात असत नाही. आपल्याला ज्यामुळे ज्ञान प्राप्त होते, ते गुरूस्थानी असते. मग ते एखादे पुस्तक असेल, प्रसंग असेल, लहान मूल असेल किंवा नैसर्गिक गोष्ट असेल.
गुरू म्हणजे अज्ञानाचा अंध:कार दूर करणारा ज्ञानाचा प्रकाश!