Aug 11, 2012

गणेशोत्सव



महाराष्ट्रातील हा फार महत्त्वाचा आणि भव्य प्रमाणात साजरा केला जाणारा उत्सव आहे. हा उत्सव म्हणजे महाराष्ट्राचे भूषणावह वैशिष्ट्य आहे. भाद्रपद महिन्यातील, शुक्ल पक्षातील चतुर्थी; या तिथीला गणपती या विद्येच्या देवतेची पूजा -अर्चा करून प्रतिष्ठापना करतात. दहा दिवस सजावट करून मूर्ती घरी वा सार्वजनिक ठिकाणी स्थापित केली जाते. महाराष्ट्रातील प्रत्येक घरात, प्रत्येक गल्ली-बोळात साजरा केला जाणारा हा उत्सव आहे.

घराघरात उत्साहाने मूर्ती आणणे, रोज पूजा करणे, सकाळ - संध्याकाळ आरती म्हणणे असे दहा दिवस किंवा सात दिवस, ५ दिवस किंवा १।। दिवसांसाठीही - त्या त्या घरातील पद्धतीनुसार केले जाते. मोदकांचा नैवैद्य, पंचखाद्य, जास्वंदाची लाल फुले, दूर्वा या गणपतीला आवडणार्‍या गोष्टी त्याला अर्पण केल्या जातात. गावागावातील सार्वजनिक मंडळांच्या माध्यमातून स्पर्धा, व्याखाने, प्रवचन-कीर्तने, गाण्यांच्या मैफिली, नाटके, लोकनाट्ये आदी सांस्कृतिक कार्यक्रम योजले जातात. पौराणिक, ऐतिहासिक देखावे, तसेच देशभक्तीपर, सामाजिक संदेश देणार्‍या देखाव्यांची सजावट करून समाजाचे मनोरंजन व प्रबोधन केले जाते.

लोकमान्य टिळकांनी या उत्सवाची क्षमता ओळखून लोकांनी एकत्र येऊन गणेशोत्सव सार्वजनिक रीतीने साजरा करावा अशी कल्पना मांडून, त्याची सुरुवात पुण्यातून केली. सुमारे १८९३ च्या दरम्यान घराघरातील गणेशोत्सवाबरोबर सार्वजनिक गणेशोत्सवाची पद्धत सुरू झाली. देश ब्रिटिशांच्या हाती होता. लोकांनी एकत्र येण्यासाठी, जनजागृतीचे कार्यक्रम करण्यासाठी या उत्सवाचा तेव्हा अतिशय उपयोग झाला. भेदभाव विसरून, सर्व जाती-धर्माच्या लोकात एकी असावी, त्यांच्यात उत्साह यावा आणि तेव्हाच विचारप्रवर्तक कार्यक्रम लोकांपुढे होऊन जनजागरणाचे कामही व्हावे यासाठी गणेशोत्सव उपयुक्त ठरला.

बदलत्या काळात सार्वजनिक गणेशोत्सवाचे स्वरूप खूपच बदलले आहे. टिळकांच्या काळात समाजाला जाग आणण्याचे काम या उत्सवाने केले. आजही समाजाचे संघटन - प्रामुख्याने तरुणांचे संघटन - होण्याच्या दृष्टीने हा महाउत्सव पूरक ठरतो. सार्वजनिक गणेश मंडळे ही महाराष्ट्राची शक्ती आहे. या मंडळांच्या माध्यमातून विधायक उपक्रम कार्यान्वित केले जातात. संकटकाळात याच मंडळांचे तरुण कार्यकर्ते समाजाच्या मदतीला धावून जातात. ही मंडळे व हा उत्सव, ह्या सामाजिक कार्यकर्ते व नेतृत्व घडणार्‍या प्रशिक्षण संस्थाच आहेत असे निश्र्चितपणे म्हणता येईल. ध्वनी प्रदूषण, विजेचा अपव्यय, वर्गणीसाठीचे गैरप्रकार, मिरवणुकांतील भांडणे इत्यादी नकारात्मक गोष्टी टाळण्याचा प्रयत्न सर्व संबंधित घटक करत असतात. या गोष्टी वगळता हा उत्सव आंतरराष्ट्रीय स्तरावरील आकर्षक व पवित्र असा महाउत्सव आहे हे निश्र्चित!
गौरीपूजन :
भाद्रपद शुक्लपक्षात षष्ठीला गौरी घरात आणली किंवा स्थापित केली जाते. सप्तमीला पूजन, अष्टमीला विसर्जन अशी या सणाची तीन दिवसांची रचना असते. या काळात महिलांची लगबग असते. घरोघरी त्यानिमित्त हळदी-कुंकू समारंभ योजले जातात. पक्वान्नाचे जेवण बनवले जाते. घराघरात स्वच्छता व सजावट अशी घरालाच वेगळे रूप देण्याचीही घाई -गडबड असते. जाती-उपजातींप्रमाणे या सणाच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. पण प्रत्येक घरात गौरी घरात निवासालाच आलेल्या आहेत या श्रद्धेने त्यांचे स्वागत, पूजन केले जाते.

काही ठिकाणी, काही घरांत गौरींनाच ‘महालक्ष्मी’ असे म्हटले जाते. ज्येष्ठ नक्षत्रावर ही पूजा होते म्हणून ‘ज्येष्ठ गौरी’ असेही म्हणतात. महालक्ष्मी आणि गौरी किंवा ज्येष्ठा-कनिष्ठा, सखी-पार्वती अशा जोडीने त्या घरात आणल्या जातात. खड्याच्या गौरी, मुखवट्याच्या गौरी, मोठ्या सजावटीसह गौरी अशा अनेक पद्धतीत पाहण्यास मिळतात.

कोकणात तेरड्याची रोपे सुपात लावून त्यावर मुखवटे ठेवतात, काही लोक विहीरीतले किंवा नदीकाठचे सात खडे आणून त्याची पूजा करतात. गौरी घरी स्थापणे, तिच्या नैवेद्यासाठी १६ भाज्या व पंचपक्वान्न करणे, पुरणाच्या १६ दिव्यांनी ओवळणे, तिसर्‍या दिवशी गौरी विसर्जन करणे असे या सणाचे स्वरूप आहे. जाती-कुटुंबे, यानुसार घराघरात वेगवेगळ्या सजवण्याच्या, खाद्य पदार्थांच्या, पूजेच्या पद्धती आहेत. महालक्ष्मीने एका राक्षसाचा वध केला आणि अनेक स्त्रियांचे सौभाग्य राखले, लोकांना सुखी केले अशीही एक कथा याबाबत सांगितली जाते.