अश्र्विन शुक्ल प्रतिपदेपासून हा उत्सव सुरू होतो. फक्त महाराष्ट्रात नाही तर अनेक राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने देवीच्या उपासनेची, सलग ९ दिवसाच्या उत्सवाची जुनी परंपरा आहे. महाराष्ट्रात या देवतेला विशेष स्थान इतिहास काळापासून आहे. दुष्टांचा संहार करणारी ही देवता (महालक्ष्मी/आंबाबाई/तुळजाभवानी/दुर्गा) वेगवेगळ्या रूपांत पूजली जाते. घरांची सफाई करणे, देवीची स्थापना करणे, उपास करणे, अनेक प्रकारचे नैवेद्य करणे, आप्तेष्टांना बोलवणे अशा प्रकारे घरातील महिला हा उत्सव साजरा करतात. परंपरेने चालत आलेल्या प्रथेप्रमाणे सर्व करण्यात गुंतलेल्या असतात. मातीच्या मडक्यांना रंग देऊन त्याचा मुखवटा करणे, पिठाच्या देवता करणे, धातूच्या मूर्ती आणणे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती विविध पद्धतींनुसार स्थापित केल्या जातात. नवव्या दिवशी शस्त्रांचे पूजन करून खंडेनवमी केली जाते. अलीकडच्या काळात उत्पादनांची निर्मिती करणार्या यंत्राची पूजा नवमीला केली जाते. महाराष्ट्रातील जवळजवळ सर्व गावातील, विविध स्वरुपांतील देवींच्या मंदिरांत हा उत्सव साजरा केला जातो. राज्यातील तुळजापूर, कोल्हापूर, वणी, माहूर, औंध आदी ठिकाणच्या देवतांच्या उत्सवाला भाविकांच्या मनात विशेष स्थान आहे.
