Aug 11, 2012

पोळा



श्रावण अमावास्येला बैलांची पूजा करून, त्यांना उत्तम जेवायला देऊन, कामातून विश्रांती दिली जाते. सजवून त्यांची मिरवणूक काढण्याचा हा दिवस.

शेतकर्‍यांच्या मदतीसाठी तत्पर असलेल्या बैलांना (पशुधनाला) त्यांच्या श्रमातून बदल देणे, त्यांना रजा देणे, त्यांच्या कष्टांची जाणीव ठेवणे असा त्यामागे अर्थ आहे. शेतातील कामे संपत आल्याने शेतकरी या उत्सवात बैलांसह आनंदाने सहभागी होऊ शकतात.

प्रत्येक शिव मंदिरात असणारा नंदी, वृषभ म्हणजेच बैल. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांत बैलांना  सजवून त्यांची मिरवणूक काढतात. ज्या ठिकाणी दुग्धव्यवसाय, एकूणच शेती मोठ्या प्रमाणात उत्पन्न देते अशा ठिकाणी भरपूर पशुधन असते. सुबत्ता असल्यास ते पशुधन सुदृढही असते. तिथे बैलपोळा मोठ्या उत्साहाने साजरा करतात. पश्चिम महाराष्ट्र त्यात पुढे आहे. कोकणात या उत्सवाला ‘बेंदूर’ असे नाव आहे. बंगालमध्ये, गुजराथमध्येही बैलांचा सण साजरा होतो. दररोज ज्याच्याकडून मेहनत करून घेतो, त्याच्या श्रमाची पावती देणे, पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून, ओवाळून खायला देणे अशा गोष्टी केल्या जातात.

बैलाचे कष्ट शेताच्या प्रत्येक कामासाठी शेतकरी घेतो, त्यामुळेच त्याला भरपूर धान्य मिळते. अशा मूक प्राण्याला शेतीची कामे संपल्यावर विश्रांती देणारा हा सण! कृषिप्रधान संस्कृती याच्या मुळाशी आहे. निसर्गरूपांना देव मानणे, नवे धान्य आल्यावर त्याची पूजा करणे, हत्यारे-अवजारे यांची पूजा करणे, जमिनीला मातेसमान मानणे या पद्धती कृषिसंस्कृतीशी जोडलेल्या आहेत